क्रीडा विश्वशेती विषयकसंपादकीय

कोरडवाहू जमीन ओलिताखाली आणून 12 माही पाणी उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणे शक्य – धनंजय मुंडे

परळी मतदारसंघात लवकरच 11 साठवण तलावांचे भूमिपूजन – ना. मुंडे.

परळी तालुक्यातील 19 बंधाऱ्यांच्या कामांचे धनंजय मुंडेंच्या हस्ते भूमिपूजन संपन्न,

10 कोल्हापुरी व 9 गेटेड बंधारे बांधण्यात येणार; दीड हजार एकर क्षेत्रओलिताखाली येणार.

परळी (दि. 21) – बीड जिल्ह्यातील शेतकरी कष्टकरी आहे मात्र निसर्ग त्याला साथ देत नाही, सिंचनाच्या सोयी देखील मर्यादित; अशा परिस्थितीत हंगामी किंवा पावसावर अवलंबून शेती करणाऱ्या शेतकरी वर्गाला 12 महिने पाणी उपलब्ध झाले तर शेतकऱ्यांचे उत्पन्न निश्चितच दुप्पट होईल, असे मत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.

याच विचारातून परळी मतदारसंघात एकूण 32 बंधारे विविध नद्यांवर बांधण्यात येत असून मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध होणार असल्याचेही धनंजय मुंडे म्हणाले. दरम्यान जलसंपदा विभागाने मध्य गोदावरी उपखोऱ्यातील पाणी उपलब्धीचा मार्ग मोकळा केल्याने 5 टीएमसी पाणी मतदारसंघाला मिळणार असून, परळी मतदारसंघात 11 साठवण तलावांचे काम येत्या काही दिवसातच हाती घेणार असल्याचे धनंजय मुंडे पुढे बोलताना म्हणाले.

परळी तालुक्यातील पांगरी येथे मतदारसंघातील 19 बंधाऱ्यांच्या कामांचे भूमिपूजन धनंजय मुंडे यांच्या हस्ते शनिवारी संपन्न झाले, त्यानिमित्त पांगरी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

या भागातील जनतेने माझ्यावर अतोनात प्रेम केले, त्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर घालण्यासाठी सर्वंकष विकासाचे स्वप्न मी पाहिलेले आहे, ते पूर्ण करण्यासाठी मी सर्व प्रकारे प्रयत्नशील असल्याचे धनंजय मुंडे यांनी नमूद केले. कोरोनाचा काळात देखील परळी ते अंबाजोगाई रस्त्याचे रखडलेले काम पूर्णत्वास नेले, परळी ते गंगाखेड, परळी ते धर्मापुरी, परळी शहर बायपास आदी रस्त्याचे काम सुरू झाले, हे सांगताना आनंद होत असल्याचे श्री. मुंडे म्हणाले.

दरम्यान एकूण 21 कोटी 89 लक्ष रुपये खर्चून 10 कोल्हापुरी पद्धतीचे व 9 गेटेड असे एकूण 19 बंधारे बांधण्यासाठी मृद व जलसंधारण विभागाने निधी उपलब्ध करून दिला आहे.

कोल्हापुरी पद्धतीचे पांगरी 1, इंजेगाव 1, कौठळी 1, कौडगाव घोडा 1, कौडगाव साबळा 1, सिरसाळ्यात 1, जयगाव 1, पोहनेर 1, हिवरा गोवर्धन 1, हसनाबाद 1 असे दहा तर गेटेड पद्धतीचे नागापूर 1, लिंबुटा 1, गाडे पिंपळगाव 3, हिवरा गोवर्धन 1, मैदवाडी 2 आणि वानटाकळी 1 असे 9 बंधारे बांधण्यात येणार आहेत.

या 19 बंधाऱ्यांच्या कामाचे भूमिपूजन धनंजय मुंडे यांच्या हस्ते शनिवारी सायंकाळी संपन्न झाले, यावेळी आ. संजय भाऊ दौंड, जिल्हा परिषद गटनेते अजय मुंडे,  जिल्हा नियोजन समितीचे सदस्य वाल्मिक अण्णा कराड, जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी श्री. परांडे, यांसह पंचायत समितीचे सभापती बालाजी मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण तात्या पौळ, विष्णुपंत देशमुख, सूर्यभान नाना मुंडे, संजय गांधी समितीचे अध्यक्ष राजाभाऊ पौळ, माऊली तात्या गडदे, पंचायत समितीचे सदस्य वसंतराव तिडके, शरद राडकर, माऊली अण्णा मुंडे, वसंत गित्ते, पांगरीचे उपसरपंच ऍड. श्रीनिवास मुंडे, गोविंद कराड, राजाभाऊ गिराम, साबळे सर, मोहन मुंडे, दिलीप कराड, चंद्रकांत फड, मनोहर केदार, भरत शिंदे, शितल अडसुडे, दशरथ मुंडे, नवनाथ गर्जे, अभिमन्यू मुंडे, भागवत मुंडे यांसह पांगरी व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

…तर वैद्यनाथही चालवून दाखवू

यावर्षी पाऊस चांगला झाल्याने ऊसाचे उत्पादन नेहमीपेक्षा अडीच ते तीन पटीने जास्त होते, ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडू नये, याचा विचार करून चालू होण्याच्या परिस्थितीत नसलेला अंबासाखर कारखाना भाडे तत्वावर घेऊन चालू केला, इतकेच नव्हे तर सुमारे सव्वा दोन लाख टन उसाचे गाळप कारखान्याने पूर्ण केले. मार्च अखेरपर्यंतची बिल देयके देखील कारखान्याने अदा केली. दुसरीकडे आशिया खंडात नावाजलेला वैद्यनाथ कारखाना आज वाईट दिवस पाहत आहे.

ऊस घेऊन जाण्यात राजकारण, बिल निघण्याचा पत्ता नाही, तक्रार करावी तर बिल तर नाहीच पण पुन्हा ऊस नेण्यात देखील अडवणूक केली जाते, अशी वाईट परिस्थिती कारखान्याने स्थानिक शेतकऱ्यांवर आणली आहे. याच शेतकरी वर्गाने आशीर्वाद देऊन आपल्याला मोठे केले, त्यामुळे आज कारखान्याला जाब विचारायची वेळ आली असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.

वैद्यनाथ कारखान्यात शेतकरी, सभासद, संचालक मंडळ नाराज, ऊस गाळपाचा हिशोब नाही, साखर – इथेनॉल आदी उत्पादन किती झाले पत्ता नाही, अशा अनेक तक्रारी यावेळी शेतकरी वर्गाने धनंजय मुंडे यांच्या समोर मांडल्या. ज्याप्रमाणे चालू व्हायच्या परिस्थितीत नसलेला अंबासाखर कारखाना चालवून दाखवला, पुढील सिझनला मुंगी येथील साखर कारखाना देखील सुरू करू आणि वेळ आलीच तर वैद्यनाथ कारखाना देखील शेतकरी हितार्थ चालवून दाखवू, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

कार्यक्रमात आ. संजय दौंड, अजय मुंडे, लक्ष्मण तात्या पौळ यांनीही आपले मनोगत व्यक्त केले,तर सूत्रसंचालन उपसरपंच ऍड. श्रीनिवास मुंडे यांनी केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button