Google search engine

Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356
Home'झेडपी'त चिक्की घोटाळा?
Array

‘झेडपी’त चिक्की घोटाळा?


म. टा. प्रतिनिधी, पुणे

काही वर्षांपूर्वी युती सरकारच्या काळात चिक्की घोटाळा गाजलेला असताना आता पुणे जिल्हा परिषदेत चढ्या दराने चिक्की पुरवठ्याचे टेंडर देण्याचा घाट घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पुणे जिल्हा परिषदेला सव्वाकोटी रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड बसण्याची शक्यता आहे. या संदर्भात जिल्हा परिषदेच्या आज, सोमवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत चर्चा होण्याची शक्यता आहे.

‘झेडपी’तील हा महिला व बाल कल्याण विभागाचा चिक्की घोटाळा समोर आल्यानंतर जिल्हा परिषदेचे सदस्य ही प्रक्रिया रद्द करणार की त्याला मान्यता देणार हे पाहणे आता आज, सोमवारी औत्सुक्याचे ठरणार आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने कुपोषित मुले, मुली; तसेच गर्भवती महिला आणि स्तनदा मातांना अतिरिक्त आहार म्हणून मायक्रोन्यूट्रियंटयुक्त गूळ, चिक्कीचा वापर केला जातो. त्याबाबत महिला व बालकल्याण विभागाने चिक्की खरेदीची निविदा काढली. त्या निविदेमध्ये ९७ रुपये प्रतिकिलो असा चढा दर देण्याचा घाट घातल्याचे समोर आले आहे.

त्याबाबत राधेश्याम महिला बचत गटाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे तक्रार केली आहे. जिल्हा परिषदेच्या खरेदी समितीने केलेल्या अटींमध्ये परस्पर बदल केल्याने खळबळ उडाली आहे. खरेदी समितीची मान्यता न घेताच अटी बदलण्यात आल्याने निविदा प्रक्रियेत घोळ झाल्याचे सांगण्यात येत आहे. चिक्की किंवा कोणत्याही स्वरूपातील आहार पुरवठा करण्यासाठी अनुभव असावा अशी अट घालण्यात आली होती; परंतु, चिक्कीच्या पुरवठ्याचा अनुभव मागताना त्यात वस्तूच बदलली आहे. जिल्हा परिषदेची एकूण तीन कोटी २१ लाख रुपयांची निविदा असून, त्यात रकमेच्या एकूण ४० टक्के अनुभवाची अट देण्यात आली आहे. यापूर्वीच्या खरेदी समितीत १० टक्के अनुभवाची अट होती; तर ४० टक्क्यांच्या अटीमुळे इतर पुरवठादारांच्या निविदा अप्रत्यक्षपणे अपात्र ठरल्या आहेत. ठराविक एका पुरवठादाराला निविदा मिळाव्यात या हेतूने निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

त्याशिवाय स्तनदा मातांसाठी अतिरिक्त आहार पुरविण्याच्या योजनेअंतर्गत आहार किट म्हणून बाळंतविडा पुरवठ्यासाठीची निविदा काढण्यात आली आहे. त्यातही घोटाळा झाल्याची तक्रार जळगाव येथील मॅट्रिक्यू हेल्थ केअर प्रॉडक्ट यांनी केली आहे. एका किटसाठी ३५० रुपये जादा देण्याचा घाट जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने घातला आहे. ही निविदा सुमारे तीन कोटी रुपयांची आहे. यात एका किटसाठी दोन हजार ३५० रुपयांचे, तर अन्य दोन जणांनी सुमारे दोन हजार रुपयांच्या रकमेच्या निविदा भरल्या आहेत. यात सुमारे ४५ लाख रुपये जिल्हा परिषदेला अतिरिक्त मोजावे लागण्याची शक्यता आहे.

चढ्या दराने देण्यात आलेल्या निविदेची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली आहे. त्याचा अहवाल देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. अहवाल येईपर्यंत पुरवठा आदेश देण्यात येऊ नये, असे आयुष प्रसाद यांनी प्रशासनाला बजावले आहे.

स्तनदा माता, गर्भवती; तसेच कुपोषित मुले मुलांसाठी अतिरिक्त आहार म्हणून गूळ, चिक्की पुरवठ्याच्या निविदेमध्ये सुमारे ८७ लाख; तसेच बाळंतविडा पुरविण्याच्या निविदेमध्ये सुमारे ४५ लाख रुपयांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेला एक कोटी ३० लाख रुपयांचा भुर्दंड बसणार आहे.

..

महिला व बाल कल्याण विभागाने चिक्कीसह बाळंतविड्यासाठी निविदा दिल्या आहेत. त्या निविदांबाबत तक्रारी आल्या आहेत. त्या तक्रारींबाबत संबंधितांची निविदा समितीसमोर सुनावणी होते. या प्रकरणाचीही सुनावणी होणार असून, त्यात योग्य निर्णय घेण्यात येईल.

– आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदSource link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments