Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

पोलिसांच्या सल्ल्यानुसारच ‘कॅमेरे’

Array


पुणे : संपूर्ण प्रभागातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व महत्त्वाच्या रस्त्यांवर-चौकात ‘सीसीटीव्ही’ लावण्यासाठीच्या लोकप्रतिनिधींमधील स्पर्धेला आता महापालिकेने ‘ब्रेक’ लावला आहे. यापुढील काळात पोलिसांच्या सल्ल्यानुसारच योग्य ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात येणार असून, हे सर्व काम विद्युत विभागातर्फे केले जाणार आहे. त्यामुळे क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावरून आग्रह आणि हट्टासाठी वाढणारी सीसीटीव्हीची संख्या आणि त्यावरील खर्च मर्यादेत राहणार आहे.

शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महापालिकेतर्फे ठिकठिकाणी क्लोज सर्किट टीव्ही कॅमेरे अर्थात सीसीटीव्ही बसवले जातात. आतापर्यंत क्षेत्रीय कार्यालय आणि विद्युत विभाग मुख्यालय अशा दोन्ही माध्यमांतून सीसीटीव्ही बसविण्यात येत होते. मात्र, आता सीसीटीव्ही बसविण्याचे काम विद्युत विभागाच्या मुख्यालयामार्फतच केले जाणार आहे. महापालिकेच्या विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदुल यांनी ‘मटा’ला ही माहिती दिली.

आगामी वर्षात महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे नगरसेवकांकडून आपापल्या प्रभागात सीसीटीव्ही बसविण्याची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सीसीटीव्ही बसविण्यासंदर्भात विद्युत विभागाने आदेश काढले आहेत. त्यानुसार आता सीसीटीव्हींची मान्यता विद्युत विभाग मुख्यालयच देणार आहे. त्यामुळे एकाच भागात अनेक सीसीटीव्ही लागण्याचा धोका टळणार असून निधीचा अपव्ययही रोखला जाणार आहे.

‘नगरसेवकांकडून सीसीटीव्ही बसविण्याच्या मागणीत अलीकडे वाढ झाली आहे. महापालिकेकडून त्याला मान्यताही दिली जात आहे. क्षेत्रीय कार्यालय व विद्युत मुख्यालयाकडूनही सीसीटीव्हीचे प्रस्ताव मंजूर केले जात असल्याने त्यात एकाच ठिकाणी सीसीटीव्ही बसविले जाण्याचा धोका आहे. निधीचा अपव्ययही होऊ शकतो. त्यामुळे आता ‘सीसीटीव्ही’साठी केंद्रीय प्रक्रिया राबवली जाणार असून, या प्रस्तावांना विद्युत विभागाच्या मुख्यालयातूनच मान्यता दिली जाईल. सीसीटीव्ही बसवायचे असल्यास क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी विद्युत विभागाशी संपर्क साधावा,’ असे कंदुल यांनी सांगितले.

शहरातील वाढती गुन्हेगारी, अपघातांच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व सीसीटीव्ही कार्यान्वित असणे आवश्यक आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून अनेक गुन्ह्यांची उकल होण्यासही मदत झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी पुण्यात झालेल्या महिला अत्याचारांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेचे अधिकारी-पदाधिकारी आणि पुणे पोलिस यांची बैठकही झाली होती. या बैठकीतही पोलिसांनी शहरातील उर्वरित महत्त्वाच्या; तसेच सार्वजनिक वावराच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर सध्या नगरसेवकांनी मागणी केल्यानंतर किंवा पोलिसांकडून सूचना आलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात येतात. यापुढे मात्र, पोलिसांच्या शिफारसींप्रमाणे त्यांनी सुचवलेल्या जागांवरच सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

नगरसेवक अथवा क्षेत्रीय अधिकाऱ्यांना आपल्या परिसरात सीसीटीव्ही बसवायचे असल्यास त्यांनी स्थानिक पोलिसांकडून पत्र घ्यावे. या पत्रात पोलिसांनी नमूद केलेल्या ठिकाणी पालिकेतर्फे सीसीटीव्ही बसविण्यात येतील. या सीसीटीव्हींचे नियंत्रण संबंधित पोलिस चौकी व ठाणे; तसेच नियंत्रण कक्षाला दिले जाईल.

– श्रीनिवास कंदुल,

मुख्य अभियंता, विद्युत विभागSource link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here