Google search engine

Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356
Home'एलपीजी'वरील अनुदानात देशभरात लक्षणीय कपात
Array

‘एलपीजी’वरील अनुदानात देशभरात लक्षणीय कपात


पुणे : केंद्र सरकारकडून घरगुती गॅस सिलिंडरच्या अनुदानाच्या निकषात बदल झाल्याने ‘इंडियन ऑइल’ आणि ‘हिंदुस्तान पेट्रोलियम‘ या दोन आघाडीच्या कंपन्यांकडून गेल्या १९ महिन्यांत ८५ टक्के ग्राहकांना सवलतीतील सिलिंडर मिळालेले नाहीत. गेल्या वर्षीच्या (२०२०) फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांत या कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरसाठी अनुक्रमे १५०० कोटी आणि ७५० कोटी रुपये अनुदान दिले होते; पण मासिक अनुदानाची ही रक्कम आता सरासरी शंभर कोटी रुपयांपर्यंत खाली आल्याचे या कंपन्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला सांगितले आहे. ऑगस्ट २०२१मध्ये ‘इंडियन ऑइल’कडून देशभरासाठी अवघे ५.२७ कोटी रुपये, तर ‘हिंदुस्तान पेट्रोलियम’कडून देशभरात अवघे ४९.७५ कोटी रुपये अनुदान देण्यात आले आहे.

‘महाराष्ट्र टाइम्स’ने माहितीच्या अधिकाराद्वारे गॅस सिलिंडरवरील अनुदानाबाबत तेल कंपन्यांकडे विचारणा केली होती. ‘भारत पेट्रोलियम’ने गेल्या दीड वर्षात सिलिंडरसाठी पुण्यासह देशातील अन्य काही मार्केटमध्ये शून्य रुपये अनुदान दिल्याचे स्पष्ट केले होते. ‘इंडियन ऑइल’ आणि ‘हिंदुस्तान पेट्रोलियम’ या कंपन्यांचे उत्तर नुकतेच मिळाले असून, त्यानुसार त्यांच्याकडून अनुदानाची रक्कम पूर्वीच्या तुलनेत जेमतेम पंधरा टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. म्हणजेच करोनापूर्वी या दोन्ही कंपन्यांकडून महिन्याला सरासरी दीड हजार कोटी रुपयांचे अनुदान थेट ग्राहकांच्या खात्यात जमा केले जात होते; मात्र करोना काळापासून या अनुदानाला उतरती कळा लागली आहे. जुलै-ऑगस्ट या कालावधीपर्यंत या दोन्ही कंपन्यांकडून गॅस सिलिंडरसाठी दोनशे ते सव्वादोनशे कोटी रुपये अनुदान दिले गेले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने ग्राहकांना मिळणारा लाभ पूर्णतः बंद किंवा रद्द केला असला, तरी अधिकृतरीत्या तसे जाहीर करण्याची तसदी मात्र घेण्यात आलेली नाही. सिलिंडरच्या किमती साडेचारशे-पाचशे रुपयांच्या घरात असतानाही ग्राहकांना अनुदान दिले जात होते. मात्र, आता याच सिलिंडरच्या किमती हजार रुपयांच्या घरात पोहोचल्या असतानाही केंद्र सरकारने अनुदानापोटी एक रुपयाही ग्राहकांच्या खात्यात जमा केलेला नसून, याबाबत कुठलेही स्पष्टीकरणही देण्यात आलेले नाही.

अनुदान किती आले खाली?

जानेवारी २०१९ ते मे २०२० या पंधरा महिन्यांच्या कालावधीत ‘इंडियन ऑइल’ कंपनीचे गॅस सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांना देशभरात सरासरी एक हजार कोटी ते बाराशे कोटी रुपयांचे अनुदान दिले जात होते. मे २०२०पासून ते ऑगस्ट २०२१ या पंधरा महिन्यांत सरासरी अनुदानाचा आकडा १४० कोटी रुपयांवर आला आहे. ‘हिंदुस्तान पेट्रोलियम’चे सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांच्या अनुदानातही घट झाली आहे. मे २०२० आधीच्या पंधरा महिन्यांच्या कालावधीत या कंपनीच्या ग्राहकांना सरासरी ५०० ते ५५० कोटी रुपये अनुदान वाटप करण्यात आले होते. मे २०२०नंतरच्या पंधरा महिन्यांत मात्र हे अनुदान अवघ्या ८० कोटी रुपयांपर्यंत खाली आले आहे.

‘अनुदान बंद नाही’ची सारवासारव

घरगुती गॅस सिलिंडरवरील अनुदानाला मोठ्या प्रमाणात कात्री लागलेली असताना, पेट्रोलियम मंत्रालयाकडून याबाबत सारवासारव केली जात आहे. ‘गॅस सिलिंडरवरील अनुदान बंद करण्यात आले नाही; मात्र देशभरातील विविध जिल्ह्यांचे ‘मार्केट’नुसार वर्गीकरण करण्यात आले. यातील काही मार्केटमध्ये अनुदान शून्य करण्यात आले आहे. काही दुर्गम भागात वाहतुकीच्या खर्चानुसार काही अनुदान देण्यात येते,’ असे उत्तर मंत्रालयाने माहितीच्या अधिकारात विचारलेल्या प्रश्नाला दिले आहे; मात्र तेल कंपन्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, देशभरातील बहुतांश ग्राहकांना मिळणारा अनुदानाचा दिलासा प्रत्यक्षात बंद झाल्याचे दिसून येत आहे.Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments