वीज कंत्राटी कामगारांची दिवाळी अंधारात


म. टा. प्रतिनिधी, पुणे

वेतन व बोनस न मिळाल्याने ‘महावितरण‘, ‘महापारेषण’ व ‘महानिर्मिती‘ या तिन्ही वीज कंपन्यांतील हजारो कंत्राटी कामगारांची दिवाळी अंधारात गेल्याची टीका भारतीय मजदूर संघाशी संलग्न महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने गुरुवारी केली.

दिवाळीपूर्वी वेतन व बोनस न दिल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघातर्फे गुरुवारी पुण्यातील ‘महावितरण’च्या रास्ता पेठ येथील मुख्य कार्यालयासह प्रत्येक जिल्ह्यातील वीज कंपन्यांच्या मुख्य कार्यालयासमोर द्वार सभा (गेट मीटिंग) घेण्यात आल्या. या वेळी कामगारांनी काळ्या फिती लावून राज्य सरकार, ऊर्जा मंत्रालय आणि वीज कंपनी प्रशासनाच्या विरोधात निदर्शने केली.

करोना संकटकाळात राज्यातील जनतेला अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी वीज कंत्राटी कामगारांनी मोठे योगदान दिले. विषाणूच्या संसर्गामुळे ५५ कामगारांचा मृत्यू झाला. ग्राहकांचे अपशब्द ऐकून, प्रसंगी मार खाऊन वीजबिलांची वसुली केली. या कष्टकरी कामगारांचे वेतन व बोनस दिवाळीपूर्वी करण्यात यावे, असे पत्र संघटनेने १३ सप्टेंबर रोजी राज्याचे प्रधान ऊर्जा सचिव व तिन्ही वीज कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिले होते. तसे परिपत्रकही प्रशासनाने जाहीर केले. मात्र, अद्याप कंत्राटी कामगारांना त्यांच्या हक्काचा पगार व बोनस मिळालेला नाही. त्यामुळे ऊर्जा मंत्रालयाने या कामगारांची दिवाळी काळी करण्याचा घाट घातला असून, सरकार, प्रशासन व ऊर्जामंत्री कंत्राटी कामगारांच्या समस्या सोडविण्याबाबत उदासीन असल्याची टीका संघटनेचे अध्यक्ष नीलेश खरात व सचिन मेंगाळे यांनी केली. या वेळी संघटन मंत्री राहुल बोडके, कोषाध्यक्ष सागर पवार, पुणे जिल्हाध्यक्ष प्रवीण पवार, सचिव सुमित कांबळे या वेळी उपस्थित होते.

फोटो ओळ – दिवाळीपूर्वी वेतन व बोनस न दिल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघातर्फे गुरुवारी पुण्यातील ‘महावितरण’च्या रास्ता पेठ येथील मुख्य कार्यालयासमोर द्वार सभा घेण्यात आली.Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here