महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बदलले का?; पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळं भाजपला शंका


हायलाइट्स:

  • चंद्रकांत पाटील यांची महाविकास आघाडी सरकारवर टीका
  • शरद पवार सरकारच्या वतीनं घोषणा कधीपासून करायला लागले?- पाटील
  • मुख्यमंत्री बदलले आहेत का?- पाटलांचा सवाल

पुणे: एसटीच्या संपावरून राज्यातील सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार जुंपली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी संपाविषयी केलेल्या वक्तव्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बदललेत का?,’ असा प्रश्न त्यांनी केला आहे.

एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कामगारांनी संप पुकारला आहे. ऐन दिवाळीत हा संप सुरू असल्यानं सर्वसामान्यांचे मोठे हाल होत आहेत. उच्च न्यायालयानं मनाई आदेश काढूनही कामगार संपावर ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर आज शरद पवार यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं होतं. ‘एसटी कामगारांचे काही महत्त्वाचे नेते मला येऊन भेटले. त्यांना संप पुढं न्यायचा नाही. पण काही लोकांनी टोकाची भूमिका घेतल्यामुळं परिस्थिती बिघडली आहे असं त्यांचं म्हणणं होतं, असं पवार यांनी आज सांगितलं. तसंच, कामगारांना संपाचा विषय अधिक ताणून न धरण्याचं आवाहनही त्यांनी केलं.

वाचा: हे सरकार पडणार नाही, कारण राणेंसारखे भित्रे…; राष्ट्रवादीचा पलटवार

पवारांच्या याच वक्तव्याचा धागा पकडून पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. ‘पवार साहेब सरकारच्या वतीनं घोषणा कधीपासून करायला लागले? मुख्यमंत्री बदलले आहेत का? सरकारच्या वतीनं उद्धव ठाकरेंनी बोलायला हवं,’ असं पाटील म्हणाले.

‘कर्मचाऱ्यांना आंदोलन करण्याची हौस नाही. २९ कामगारांनी आत्महत्या केल्या आहेत. दिवाळीचा तिसरा दिवस उजाडला तरी सरकार त्यांच्या मागण्या मान्य करायला तयार नाही. कामगारांना १७ महिन्यांचा पगार मिळालेला नाही. अवघा अडीच हजार रुपये बोनस देण्यात आलाय. घरात काम करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा आपण पाच हजार रुपये देतो,’ असा संताप पाटील यांनी व्यक्त केला. ‘कोविडच्या काळात एसटी सेवा नसती तर महाराष्ट्राला अर्धांगवायू झाला असता. अशा एसटी कामगारांकडं तुम्ही दुर्लक्ष करता? आतापर्यंत झालेल्या आत्महत्या वाढवायच्या आहेत का?,’ असा सवालही त्यांनी केला. ‘एसटी कामगारांच्या सर्व मागण्यांच्या बाजूनं भाजप ताकदीनं उभा आहे,’ असंही त्यांनी स्पष्ट केलं.

वाचा: शिवसेनेला दुसऱ्याच्या मुलाचं बारसं करायची सवयच आहे; राणेंची बोचरी टीकाSource link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here