पुणेकर निघाले सुट्टीवर


म. टा. प्रतिनिधी, पुणे

घरचा फराळ, फटाके, लक्ष्मी पूजनाचे सोपस्कार पूर्ण करून शुक्रवारपासून पुणेकर भटकंतीला बाहेर पडणार आहेत. पाडवा, भाऊबीज आणि रविवारची सुट्टी जोडून आल्याने पुणेकरांनी भटकंतीची जय्यत तयारी केली आहे. कोकणातील समुद्र किनारे, थंड हवेची ठिकाणे अन् राज्यांतर्गत पर्यटनाचे बेत आखले आहेत.

करोनाचा प्रादूर्भावामुळे गेल्या वर्षी अनेकांनी दिवाळी घरी बसूनच साजरी केली. या वर्षी मात्र दसरा संपल्यावर उत्साही पर्यटकांनी लगेच दिवाळीतील सहलींचे नियोजन केले. करोना प्रतिबंधक लशींचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांवरील निर्बंध बहुतांश राज्यांनी शिथिल केले आहेत. त्यामुळे पर्यटकांचा प्रतिसाद वाढला असून गतवर्षीच्या तुलनेत या दिवाळीत पर्यटनामध्ये उल्लेखनीय वाढ झाल्याचे निरीक्षण पर्यटन कंपन्यांनीही नोंदवले आहे.

भाऊबीजचे गेटटुगेदर

लॉकडाउनचे नियम आणि करोनाबद्दल असलेल्या भीतीमुळे गेल्या वर्षभरात अनेकांनी कौटुंबिक स्नेहमेळावे रद्द केले होते. दिवाळीच्या निमित्ताने यंदा अनेकांनी पर्यटनस्थळी ‘गेटटुगेदर’चे नियोजन केले आहे. यासाठी महाबळेश्वर, पाचगणी, कोकणात, पुण्यालगतच्या परिसरात फार्म हाऊस, खाजगी बंगल्यांच्या बुकींगला पर्यटकांचा प्रतिसाद मिळाला आहे.

कोकण किनाऱ्यांची भूरळ कायम

कोकणातील अलिबाग, वळणेश्वर, रत्नागिरी, दिवेआगार, गुहागर, गणपतीपुळे, हरिहरेश्वर, तारकर्ली, वेंगुर्ला, देवबाग या लोकप्रिय ठरणाऱ्या समुद्रकिनाऱ्यांची भूरळ अजूनही कायम आहे. पर्यटकांनी लहानमोठी रिसॉर्ट, होम स्टे आणि खाजगी बंगल्यांचे बुकींग केले आहे. कोकण किनाऱ्यांसह महाबळेश्वर, पाचगणी, कोयना, पन्हाळा, भंडारदरा, आंबोली, माथेरान या ठिकाणांचे मोठ्या प्रमाणावर बुकिंग केले आहे.

राजस्थान, केरळ, गुजरातला पसंती

महाराष्ट्राबरोबरच गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, कर्नाटक, लेह-लडाख, काश्मीर येथील सहलींना पर्यटकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. दसऱ्यानंतर बहुतांश राज्यांनी लॉकडाउनचे नियम शिथिल करून पर्यटनाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्व वयोगटांतील नागरिक पर्यटनासाठी इच्छुक नागरिकांनी दिवाळीच्या मोठ्या सुट्ट्यांसाठी देशांतर्गत सहलींचा पर्याय निवडला आहे. परदेशातील पर्यटनासाठीचे निर्बंध अद्याप शिथिल झाले नसल्याने अनेक पर्यटक देशांतर्गत सहलींना पसंती देत आहेत.

व्याघ्र दर्शनाला पर्यटक इच्छुक

हटके पर्यटनाची आवड आणि जंगलाबद्दल असलेल्या कुतूहलामुळे अनेकांनी जंगल पर्यटनालाही पसंती दिली आहे. आल्हाददायक वातावरणात जंगल भ्रमंतीचा अनुभव घेण्यासाठी पर्यटकांनी ताडोबा, नागझिरा, पेंचमधील व्याघ्र सफरीचे बुकींग केले आहे. छोटी कुटुंब, मित्र मैत्रिणींचे ग्रुप करून नागरिक व्याघ्र दर्शनाला जाणार आहेत. महाराष्ट्राबाहेर कान्हा, रणथंबोर, बांधवगड, गीर या जंगल सफारींचा चांगली मागणी आहे. महिनाभरापूर्वीच अनेकांनी जंगलातील सफारींचे बुकींग करून ठेवले आहे.

हिवाळ्यातील पर्यटन हंगामासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची सर्व रिसॉर्ट सज्ज झाली आहेत. पर्यटकांच्या आदरातिथ्यासाठी आम्ही या वर्षी नवीन योजना जाहीर केल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. दसऱ्या संपल्यावर लगेचच पर्यटकांनी बुकींगला सुरुवात केली. करोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही पर्यटकांच्या सुरक्षेचे योग्य नियोजन केले आहे.

– दीपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, ‘एमटीडीसी’Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here