पासष्टाव्या कलेने ग्राहकांशी जोडले भावनिक बंध


म. टा. प्रतिनिधी, पुणे

पासष्टावी कला अशी ओळख असलेल्या जाहिरात या कलेतून ग्राहकांशी भावनिक बंध जोडण्याचा नवा ‘ट्रेंड’ रुळताना दिसतो आहे. आपले उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहचविण्यासाठी विविध ऑडिओ-व्हिज्युअल जाहिराती ‘डिजिटल’ माध्यमांमध्ये केल्या जात आहेत. स्थानिक पातळीवरील या जाहिरातींना उत्तम प्रतिसादही मिळत आहे.

जाहिरात करताना करोनाच्या काळात झटणाऱ्या करोनायोद्ध्यांना करण्यात आलेले अभिवादन, आजोबा आणि आजीच्या प्रेमाची गोष्ट सांगून त्यातून समोर आणलेली दागिन्यांची जाहिरात, अशा भावनिक करणाऱ्या आणि सामाजिक संदेश देणाऱ्या डिजिटल जाहिरातींनी सध्या समाजमाध्यमांचे अवकाश व्यापले आहे. काही वर्षांपूर्वी देशभर पोहोच असलेल्या ‘ब्रँड’नी अंगीकारलेली ही पद्धत आता स्थानिक उत्पादकांमध्येही रुजताना दिसते आहे.

टीव्हीवरील जाहिरातींचे दर परवडणारे नसल्याने डिजिटल जाहिरातींना उत्पादक आणि व्यावसायिकांची पसंती मिळते. समाजमाध्यमांवर असल्याने या जाहिरातींचा कालावधीही वाढवता येतो. हीच संधी साधून काही प्रतिभावंत लेखक, दिग्दर्शक पुढे सरसावले आहेत. ‘ब्रँडिंग’च्या निमित्ताने रसिकांना एक भावनिक करणारी, सामाजिक संदेश देणारी गोष्ट सांगण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. याच प्रयत्नांमधून गेल्या वर्षभरापासून तयार होत असलेल्या जाहिरातींद्वारे रसिकांना या डिजिटल जाहिराती आपल्याशा वाटत आहेत.

चितळे बंधू मिठाईवाले, पीएनजी अँड सन्स, अनुरूप विवाहसंस्था, कॉटनकिंग, रावेतकर बिल्डर्स, लक्ष्मीनारायण चिवडा अशा पुण्यातील काही नामवंत व्यावसायिकांकडून ‘ब्रँडिंग’ करण्यासाठी अशा प्रकारच्या जाहिरातींचा वापर केला जात असल्याचे सध्या दिसते आहे. पुण्यातील इतरही अनेक व्यावसायिकांनी उत्पादनाची जाहिरात करते वेळी अशाच पद्धतीच्या जाहिरातींची निर्मिती करायला सुरुवात केली आहे. पुण्यातील बहुतांश नामवंत व्यावसायिकांच्या तरुण पिढ्या आता व्यवसाय सांभाळत आहेत. या तरुण उद्योजकांना जाहिरातीचा हा ‘ट्रेंड’ अधिक आपलासा वाटत असल्याने या प्रकारच्या जाहिरातींची मागणी वाढत असल्याचे दिग्दर्शक आणि लेखकांकडून सांगण्यात आले आहे.

कोट

आम्ही चित्रपट दिग्दर्शक आहोत. कलाकृतीद्वारे सामाजिक संदेश देणारी, समाजातील भावनांचे दर्शन घडवणारी गोष्ट सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतो. यात एखाद्या उत्पादनाचे ‘ब्रँडिंग’ होत असेल, तर प्रेक्षकांना ती गोष्ट आणि संबंधित उत्पादन, अशा दोन्ही गोष्टी लक्षात राहतात. यामुळे उत्पादनाचे ब्रँडिंग आणि कलाकृती, अशा एकत्रिकरणातून एकाच वेळी अनेक गोष्टी साधता येतात. उद्योजकांच्या नव्या पिढीला जाहिरातींची ही पद्धत अधिक भावत असल्याने हा ‘ट्रेंड’ नावारूपाला आला आहे.

– नितीश पाटणकर, दिग्दर्शक

कोट

सामाजिक संदेश देणाऱ्या डिजिटल जाहिराती प्रामुख्याने सणांच्या वेळी प्रेक्षकांसमोर आणल्या जातात. गणेशोत्सवासारख्या सणांमध्ये समाजातील मोठा वर्ग सक्रिय असतो. या वर्गाचे प्रतिबिंब या जाहिरातींमधून उमटावे, असे लेखक, दिग्दर्शक म्हणून आम्हाला वाटते. मग या वर्गाभोवती कथा गुंफली जाते. करोनाच्या काळात समाजासाठी झटलेल्या काही विशिष्ट वर्गाचे प्रतिनिधित्व करणारी पात्र काही जाहिरातींमधून दिसली.

– वरुण नार्वेकर, दिग्दर्शकSource link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here