निळ्या भाताला बहरम. टा. वृत्तसेवा,

जिल्ह्यात प्रथमच आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात कृषी विभागाच्या सहकार्याने शेतकऱ्यांनी आसाम आणि इंडोनेशियात पिकविल्या जाणाऱ्या निळ्या भाताची लागवड केली आहे.

या निळ्या भाताचे उत्पादन ११० दिवसांत घेतले जात असल्याने दुसऱ्या पिकांसाठी जमीन उपलब्ध होते. यामुळे शेतकऱ्यांना दुबार पीक घेणे सहज शक्य होणार आहे. शेतातील धानाची लांबी पाहता पारंपरिक धानापेक्षा निश्चितच जास्त उत्पादन होईल, असा विश्वास शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

शेतकरी गंगाराम हिले (फुलवडे), संतोष फलके (बोरघर), शामराव दांगट (दिगद), सिताराम असवले (आमडे), लिंबाजी केंगले (जांभोरी), विजय आढारी (चिखली), अनंत लोहकरे, रामचंद्र लोहकरे, पांडुरंग लोहकरे, लक्ष्मण लोहकरे (मापोली) या आदिवासी शेतकऱ्यांनी निळ्या भाताची लागवड केली आहे. या भाताच्या ओंब्या काळ्या असतात. यामुळे काही ठिकाणी याला काळा भात म्हणून गणले जाते.

निळ्या भाताचे फायदे
निळ्या भातामध्ये भरपूर प्रमाणात अँटीअॅक्सिडेंट आणि अँथोसायनिन असतात.

पांढऱ्या भातापेक्षा निळ्या भातात चरबी कमी असल्याने आरोग्यदायी.

वजन कमी करण्यातदेखील उपयुक्त.

निळ्या भातामधील अँथोसायनिन रक्तातील साखर नियंत्रित करतो.

१०० ग्रॅम निळ्या भातामध्ये साधारणतः ४.५ ग्रॅम फायबर असते.

पचनक्रिया अधिक चांगली राखण्यास मदत.

कॅन्सरसह विविध आजारांसाठी गुणकारी.

महाराष्ट्रात प्रथम नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात निळया तांदळाची लागवड सुरू झाली होती. नावीन्यपूर्ण बाब म्हणून हे बियाणे कृषी विभागामार्फत आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना देण्यात आले होते. या वाणाची वाढ चांगली असून, परिसरात ही लागवड चर्चेचा विषय ठरत आहे. पुढील काळात निळ्या तांदळाच्या लागवड क्षेत्रात मोठी वाढ होईल.

– पी. के. चौधरी, तालुका कृषी अधिकारी, आंबेगाव

भारतात ‘आसामी काळा भात’ म्हणून प्रसिद्ध

अकोले (जि. नगर) तालुक्यातील धामणवन आणि शिरपुंजे परिसरातील काही शेतकऱ्यांनी निळ्या भाताची लागवड केली होती. या भातात औषधी गुणधर्म आहेत. तसेच, यात फायबर, लोह, ताम्र, अँटीऑक्सिडेंटचे प्रमाण अधिक आहे. भारतात हा ‘आसामी काळा भात’ म्हणून प्रसिद्ध आहे. पंचतारांकित हॉटेलात याला मोठी मागणी असते. याची उंची जास्त आणि दणकट बुंधा असल्याने कितीही वारे आले तरी तो खाली पडत नाही. याची एकरी वीस ते पंचवीस पोते साळ निघते. हा भात शिजवल्यावर निळा, जांभळा दिसतो. तो इंडोनेशिया आणि आसामच्या व्यापार संबंधांतून भारतात आला आहे. सध्या बाजारात या भाताची तीनशे ते पाचशे रुपये किलो दराने विक्री होते. आसाम, मणिपूर, पंजाबमध्ये निर्यातक्षम तांदळात याची गणना होते.

फोटो ओळी

– दिगद येथील निळ्या भाताच्या ओंब्या. ( मधुकर गायकवाड)Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here