स्कुटीची डिकी उघडून पळवले साडेतीन लाख रुपये

माजलगाव शहर पोलीस स्टेशन समोर घडली घटना

शहरावर निगराणी ठेवण्यासाठी लावलेले सीसीटिव्ही कॅमेरे देखभालि अभावी बंद

माजलगाव / ( वर्तमान महाराष्ट्र )

येथील मोंढ्यातील व्यापारी दुकान बंद करून घरी जात असताना शहर पोलीस स्टेशन समोर एका टपरीवाल्याशी बोलत असताना चोरट्यांनी त्यांच्या स्कुटीच्या डिक्की मध्ये ठेवण्यात आलेली साडेतीन लाख रोख रकमेची पिशवी पळवली. ही घटना बुधवारी संध्याकाळी साडेनऊच्या सुमारास घडली.
मोंढा भागातील पान मटेरियल व अन्य वस्तूंचे ठोक दुकानदार अनिल उर्फ बाळु शांतीलाल दुगड यांचे प्रेमशांती ट्रेडिंग कंपनी नावाचे दुकान आहे. अनिल दुगड हे काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यामुळे त्यांचे मेहुने श्रीपाल हिरालाल मुनोत हे संध्याकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास दुकान आवरून शहर पोलीस ठाण्यासमोर असलेल्या केचाळे पान सेंटर या ठिकाणी टपरीवाल्याशी बोलत असताना त्यांच्या डिकीत ठेवण्यात आलेली पैशांची पिशवी चोरट्यांनी पळवली.
या पिशवीमध्ये ३ लाख ५२ हजार १०० रूपये होते. या प्रकरणी श्रीपाल मुनोत यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहा.पोलीस उपनिरीक्षक अविनाश राठोड हे करत आहेत.

शहरावर निगराण ठेवण्यासाठी लावण्यात आलेले सीसीटिव्ही कॅमेरे बंद

विशेष म्हणजे ही घटना जेथे घडली तेथेच माजलगाव शहरावर निगराणी ठेवणारे सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. परंतु हे कॅमेरे देखभाली अभावी बंद पडलेल्या अवस्थेत आहेत असे पोलीस ठाण्याकडून सांगण्यात येते.

शहरात वाढतेय गुन्हेगारीचे प्रमाण ; पोलीस प्रशासन करतंय तरी काय?

शहरात दिवसेंदिवस चोऱ्या, दरोडा, लूटमारीच्या घटना वाढत आहेत. आणि उत्तम दगडोबा गडम यांच्या लूटमारीची घटना ताजी असतानाच भरवस्तीतून पैशांची पिशवी चोरीला जाणे हे अत्यंत भयावह आहे. तरी पोलीस प्रशासन या गुन्हेगारींचे प्रमाण रोखण्यासाठी काही करतंय की नाही असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

Back to top button