अन्न वस्त्र निवारा

घरगुती पद्धतीने तपासा अन्नपदार्थांमधील भेसळ

 घरगुती पद्धतीने तपासा अन्नपदार्थांमधील भेसळ

अन्न ही मानवाची मुलभुत गरज आहे. वाढत्या लोकसंख्येसाठी अन्नपुर्तता करणे हे आपल्या देशासमोर मोठे आव्हान आहे. सद्यपरिस्थितीत अन्नपदार्थातील भेसळ दिवसेंदिवस उग्र रूप घेत आहे. अन्न पदार्थाची भेसळ म्हणजे एखाद्या पदार्थाची गुणवत्ता कमी करून त्याचे वजन किंवा आकारमान वाढविणे. ही भेसळ विक्रेत्यांकडून जास्त नफा मिळवण्यासाठी सर्रास केली जाते. अन्नभेसळीमुळे मानवी आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी अन्नातील भेसळ ओळखणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. अन्नभेसळ चाचणीसाठी लागणारी अत्याधुनिक उपकरणे मोठ्या प्रयोगशाळेत असतात. सामान्य व्यक्तीला अन्नभेसळ ओळखता येणे त्यामुळे अवघड आहे. ते सोपे करण्यासाठी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) यांनी एक माहिती पुस्तिका तयार केली आहे. या माहिती पुस्तिकेमध्ये, भारतामध्ये भेसळ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या पदार्थांची यादी तयार केली आहे. या माहिती पुस्तिकेमध्ये घरगुती गोष्टी वापरून अन्नसुरक्षा, पदार्थांमधील भेसळ आणि त्याची ओळख कशी करावी याबद्दल माहिती दिली आहे ती आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.

अन्नातील भेसळ ओळखण्यासाठी काही सोप्या पद्धती.

दूधामध्ये पाण्याची भेसळ

 1. एका बशी मध्ये दूधाचा एक थेंब टाकून ती तिरकी पकडा.                                                          
 2. शुद्ध दूधाचा थेंब जागेवर थांबेल किंवा हळूहळू खाली सरकले आणि मागे पांढरा पट्टा तयार होईल.
 3. दूध जर भेसळ युक्त असेल तर लगेच खाली वाहून जाईल आणि मागे कोणतीही खुण शिल्लक राहणार नाही.

दूधामध्ये कपडे धुण्याच्या सोड्याची ची भेसळ

 1. काचेच्या वाटी मध्ये दूध आणि पाणी समप्रमाणत घेऊन चांगले मिश्रण तयार करून घ्या. 
 2. दूधामध्ये जर धुण्याचा सोडयाची भेसळ केली असेल तर दूधामध्ये जाड असा फेस तयार होईल,जो लवकर कमी होणार नाही. 
 3. दूध जर शुद्ध असेल तर आलेला फेस लगेच कमी होऊन जाईल.

दूध आणि दुग्धजन्य (खवा, चक्का, पनीर) पदार्थांमध्ये पिष्टमय पदार्थांची भेसळ

 1. २-३ ग्रॅम दुग्धजन्य पदार्थांमध्ये थोडे पाणी टाकून गरम करून घ्यावे. )दूधाच्या बाबतीत पाणी टाकून गरम करण्याची आवश्यकता नाही). 
 2. दूध थोडे थंड झाल्यावर त्यामध्ये आयोडीन )जखमेवर लावायचे औषध)चे २ थेंब टाकावेत.
 3. दूधाचा कलर निळा झाला तर दूधामध्ये पिष्टमय पदार्थ आहेत असे समजावे.

तूप आणि लोण्यामधे रताळ्याची किंवा बटाट्याची भेसळ

 1. एका काचेच्या वाटी मध्ये अर्धा चमचा तूप किंवा लोणी घ्या.
 2. त्यामध्ये टिंचर आयोडीन चे २ ते ३ थेंब टाका.
 3. तुपाचा किंवा लोण्याचा रंग निळा झाला तर त्यामध्ये रताळ्याची किंवा बटाट्याची भेसळ आहे असे सिद्ध होते.

खोबऱ्याच्या तेलामधील भेसळ

 1. पारदर्शक काचेच्या पेल्यामध्ये खोबऱ्याचे तेल घ्या.
 2. तो पेला ३० मिनिटासाठी फ्रीझ मध्ये ठेऊन द्या(फ्रीझर मध्ये ठेऊ नका).
 3. खोबऱ्याचे तेल लवकर घट्ट होते.
 4. जर खोबऱ्याचे तेल भेसळयुक्त असेल तर दुसऱ्या तेलाचा थर वेगळा दिसेल.

मधातील साखरेची भेसळ 

 1. काचेच्या पारदर्शक पेल्यामध्ये पाणी घ्या.
 2. त्यामध्ये ३-४ मधाचे थेंब टाका.
 3. शुद्ध मध पाण्यात विरघळत नाही.
 4. जर मध पाण्यात विरघळला तर त्यामध्ये साखरेची भेसळ असे असे समजावे.

साखर आणि पीठी साखरेतील खडूची भेसळ

 1. काचेच्या पेल्यामध्ये पाणी घेऊन त्यात १० ग्राम पीठी साखर टाका.
 2. पाणी नितळ न होता पांढरे होऊन पेल्यामधे तळाला पांढरी भुकटी शिल्लक राहिली तर यामध्ये खडूची भुकटी आहे असे समजावे.

गव्हाच्या पिठामध्ये लाकडाच्या भुस्याची भेसळ

 1. काचेच्या पारदर्शक पेल्यामध्ये  पाणी घ्या.
 2. एक चमचा गव्हाचे पीठ चिमटीने पसरून टाका.
 3. भेसळयुक्त पीठामध्ये लाकडाचा भुसा पाण्यावर तरंगताना दिसेल तर शुद्ध गव्हाचे पीठ तळाला जाऊन बसते.

धान्यांमध्ये रंगाची भेसळ 

 1. पारदर्शक पेल्यात पाणी घेऊन त्यामध्ये २ चमचे धान्य टाका आणि मिश्रण ढवळा. 
 2. धान्य जर भेसळयुक्त असेल तर पाण्याचा रंग बदलेल.

हिंगामध्ये डिंकाची भेसळ  

 1. ग्रॅम हिंग पावडर पाणी असलेल्या काचेच्या पेल्यात टाकून ढवळा.
 2. हिंग जर भेसळयुक्त असेल तर न विरघळता तळाला जाऊन बसेल.
 3. शुद्ध हिंग पाण्यात मिसळून दुधाळ रंग तयार होईल.

हळदीमध्ये रंगांची भेसळ 

 1. पारदर्शक पेल्यात पाणी घेऊन त्यामध्ये १ चमचा हळद टाका आणि मिश्रण ढवळा.
 2. हळद शुद्ध असेल तर थोडा रंग सोडेल आणि तळाला जाऊन बसेल आणि जर हळद भेसळयुक्त असेल तर तळाला  बसताना खूप रंग सोडेल. 

यासारख्या अन्नपदार्थांच्या इतरही चाचण्या करता येतात त्या आपणाला भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) च्या संकेतस्थळावर (https://fssai.gov.in/) पाहायला मिळतील. या चाचण्या वापरून तुम्हाला जर पदार्थांमध्ये भेसळ आढळल्यास तुम्ही जवळच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्याकडे किंवा FSSAI च्या संकेतस्थळावर (https://foscos.fssai.gov.in/consumergrievance/)  जाऊन तक्रार नोंदवू  शकता. 

अनिकेत भिसे ( अन्नसुरक्षा अधिकारी अन्न व औषध प्रशासन नांदेड )

वर्तमान महाराष्ट्र

वार्ता सत्याची जनतेच्या हिताची!
Back to top button