राहुल रेखा रामहारी शिंदे याचे दुःखद निधन


राहुल बाळा घाई केलीस आणि चुकलासच……..!
प्रिय राहुल बाळा,
इतका अल्पायुषी असशील याची दुरुनही कल्पना नव्हती… तुझ्या जाण्याची बातमी खूपच वेदनादायी आहे.
तुला पाचवीपासून शिकविताना खूप जवळून न्याहाळलं होतं. एक गुणी कलाकार, चित्रकार एक जन्मजात आर्टिस्ट माझ्या वर्गात वाढत होता. तुझी कलात्मक आवड पाहून तुझ्या आईबाबांना तुला कला क्षेत्राकडे संधी देण्याची मी विनंती केली. दोघेही शिक्षक असणाऱ्या तुझ्या आई पप्पानी निसंकोच माझ्यावर विश्वास ठेवून सर्वोत्कृष्ठ कला महाविद्यालयात तुला प्रवेश दिला. तुही दिलेल्या संधीचे सोने करत एक परिपूर्ण आर्टिस्ट बनलास. देशाचा प्रसिद्ध अभिनेता अमीर खान सारख्या महान कलाकाराच्या “सत्यमेव जयते” या कार्यक्रमाचा सेट बनविण्यात तुझा असलेला मोठा सहभाग आमच्या साठी खूप मोठा अभिमान होता. परंतु नियती अनेक वेळा अशाच यशस्वी माणसाच्या आयुष्यावर अचानक वार करते आणि सगळं कांही संपून जातं. तुझ्या बाबतीतही असंच घडलं. इतक्या कमी वयात तुझं निघून जाणं तुझ्यावर सर्वोच्य प्रेम करणाऱ्या तुझ्या आई-पप्पानां किती अवघड आहे याची आज कल्पना करता येत नाही. तुझ्या सारख्या गुणी विद्यार्थ्याचे असे अवेळी निघून जाणे आमच्यासारख्या शिक्षकांना आईवडिलांइतकंच दुःखदायी आहे. राहुल, तू कलेत जिंकलास पण जीवनात हरलास…! यशाच्या वाटेवर अनेक धोके असतात त्याकडे तू दुर्लक्ष केलंस. आयुष्यात सतत आपल्या मनासारखेच घडेलच असे नसते बाळा…त्यातून मार्ग काढताना तुझा नकळत तोल गेला आणि निराशेच्या व चुकीच्या मार्गावर उभा राहिलास….हीच आम्हां सर्वांसाठी दुःखद गोष्ट ठरली. तू गेलास, परत न येण्यासाठी…मात्र किमान तुझ्यावर प्रेम करणाऱ्या तुझ्या मित्रांनी तुझ्या आज नसण्याचा बोध बोध घेणे गरजेचे आहे. तुझी आठवण आयुष्यभर राहील…तुझ्या परिवाराच्या दुःखात सहृदय सहभागी आहोत…पण तू नाहीस…. तुला समस्त केजवासीयांची भावपूर्ण श्रद्धांजली!