नंदकिशोर मुंदडाच्या अमरण उपोषण इशाऱ्यानेच आले महावितरण ताळ्यावर


बहुतांशी लोकोपयोगी मागण्या पूर्ण; उर्वरित मागण्यांच्या लेखी आश्वासानामुळे उपोषणाला स्थगिती
अंबाजोगाई – महावितरण अंतर्गत येणारी केज विधानसभा मतदार संघातील विजेसंदर्भातील अनेक कामे मंजुरी आणि कार्यादेश देण्याअभावी रखडली आहेत. महावितरणची जिल्ह्यात सर्वाधिक वसुली केज मतदार संघात होऊनही कामाच्या अंमलबजावणीत मात्र दुजाभाव केला जात आहे. तसेच, नादुरुस्त रोहित्राची वाहतूकही शेतकऱ्यांना स्वखर्चातून करावी लागत आहे. या सर्व भोंगळ कारभार विरोधात आणि प्रलंबित प्रस्ताव तत्काळ मंजूर करावेत या मागणी साठी ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर महावितरण ताळ्यावर आले असून मुंदडा यांना केलेल्या बहुतांश मागण्यांवर तातडीने कार्यवाही करण्यात आली आहे. तर, उर्वरित मागण्या वेळेच्या बंधनात पूर्ण करूत असे लेखी आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर मुंदडा यांनी उपोषण स्थगित केले.
केज मतदार संघातील प्रमाबित कामे पूर्ण करावीत, मान्सून पूर्व दुरुस्तीची कामे करावीत अशा सूचना चार महिन्यापूर्वीच आमदार नमिता मुंदडा यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना केल्या होत्या. मात्र, पुन्हा ही कामे रखडली. त्यामुळे नंदकिशोर मुंदडा यांनी उपोषणाचा निर्णय घेतला. त्यांनी निर्णय मागे घ्यावा यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी चार तास त्यांच्यासोबत बैठक केली. यावेळी कार्यकारी अभियंता जितेंद्र वाघमारे यांनी नंदकिशोर मुंदडा यांनी केलेल्यापैकी बहुतांशी मागण्या पूर्ण करण्यात आल्याचे सांगितले. एनएससी योजने अंतर्गतवाड्या, वस्त्या येथे सिंगले फेज वीजपुरवठा करण्याचे प्रस्ताव मंजूर करून संबंधित कामाविषयीचे कार्यादेश कंत्राटदारास देण्यात आलेले आहेत. प्रस्तावित सहा लिंक लाईनपैकी नागझरी फिडर, लोखंडी फिडर, कुंबेफळ सबस्टेशन आणि धावडी ते सोनवळा या चार लिंक लाईनला बीड मंडळ कार्यालयकडून मंजुरी मिळाली आहे.
उर्वरीत दोन लिंक लाईन आरडीएसएस योजनेत प्रस्तावित केलेली आहे. त्याव्यतिरिक्त आरडीएसएस योजनेमध्ये ४३ किमी लिंक लाईन प्रस्तावित केलेली आहे. नवीन फीडर अतिभारीत उपकेंद्राचे बायफरगेशन, अतिभारीत ६३ के. व्ही.ए. च्या ठिकाणी १०० के. व्ही.ए. क्षमतेचे रोहित्र बसविणे इ. कामे सुधारीत वितरण क्षेत्र योजनेमध्ये प्रस्तावित करण्यात आली आहेत. केज विधान सभा मतदारसंघातील रोहित्र क्षमता वाढ, अतिरिक्त रोहित्र उभारणे तसेच अनुसूचित जातीच्या शेतीपंपास वीज पुरवठा करणे यासंबंधित कामाविषयी प्रशासकीय मान्यतेच्या मर्यादेत कार्यादेश देण्यात आलेले आहेत.
अतिरिक्त रोहित्र, अतिभारीत रोहित्र क्षमता वाढीचे सर्व प्रस्ताव मंजूर करण्यात आलेले असून संबंधित सर्व कामाविषयीचे कार्यादेश देण्यात आलेले आहेत. उंदरी येथील ३३ के.व्ही. उंदरी उपकेंद्राचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला असल्याची लेखी माहिती वाघमारे यांनी दिली. केज, धारूर, अंबाजोगाई उपविभागातील उच्चदाब, लघुदाब लाईनची मेंटेनन्सची कामे तत्काळ करण्यात येतील. तसेच, कोपरा व अंजनपूर येथील अतिवृष्टीमध्ये झालेल्या पायाभूत सुविधांची उपलब्ध निधीनुसार तत्काळ करण्यात येतील असे लेखी आश्वासन कार्यकारी अभियंता जितेंद्र वाघमारे यांनी दिल्यानंतर नंदकिशोर मुंदडा यांनी उपोषणाला स्थगिती देत असल्याचे जाहीर केले. यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता, विश्वनाथ भारती, केजचे उपकार्यकारी अभियंता राजेश अंबेकर, अंबाजोगाईचे उपकार्यकारी अभियंता संजय देशपांडे, शरद इंगळे, वैजनाथ देशमुख, ऍड. संतोष लोमटे, बळीराम चोपणे, प्रशांत आदनाक, अमोल पवार, ऍड. चामनर, महेश अंबाड,योगेश कडबाने, अजय राठोड, बाळा गायके आदी उपस्थित होते.
नादुरुस्त रोहित्राच्या वाहतुकीसाठी वाहनव्यवस्था
मुंदडा यांच्या मागणीनुसार केज, धारूर, अंबाजोगाई उपविभागातील जळीत व नादुरुस्त रोहित्र ने-आण करणे करीता स्वतंत्र वाहनाची कप्पी सहित व्यवस्था महावितरणकडून करण्यात आली आहे. अंबाजोगाई उपविभागासाठी एमएच २४ एबी ५३४० आणि केज, धारूर उपविभागासाठी एमएच ५० – ००२९ या क्रमांकाची वाहने देण्यात आली आहेत.
कुंबेफळ रोहित्र क्षमतावाढीचा प्रस्ताव मंजूर
केज तालुक्यातील कुंबेफळ येथील ३३ केव्ही रोहित्राला अतिरिक्त पाच एमव्हीचा रोहित्र देण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. तसेच, धनेगाव येथील पाच एमव्हीच्या रोहीत्राचा प्रस्ताव देखील लवकरच मंजूर होईल. तसेच, उंदरी येथील ३३ के.व्ही. उंदरी उपकेंद्राचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.
वाडी-वस्ती, मागासवर्गीय वस्तीतील बहुतांश कामांना मंजुरी
नंदकिशोर मुंदडा यांच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर एन.एस.सी. योजनेतर्गंत केज मतदार संघातील वाड्या-वस्ती, तसेच मागासवर्गीय वस्तीतील सिंगल फेजच्या जवळपास ३० कामांना मंजुरी मिळाली आहे. लवकरच ही कामे सुरु होणार आहेत.